"Gokulashtami"

महाराष्ट्रात हा दिवस गोपाळकाला, दहीकाला म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच या दिवशी दहीहंडी फोडून साजरा करतात. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते.

कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की, कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पूत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येकवेळी तिला नजरकैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्याला सुपूर्त केलं होतं. भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.