"Guru Purnima"

एक कुंभार ज्याप्रमाणे सुबक रितीने मातीचे मडके घडवतो अगदी त्याच तऱ्हेने गुरू चांगल्या वाईट गोष्टींची पारख घडवुन अत्यंत परिश्रमाने शिष्याला घडवतो.गुरूपौर्णिमा यालाच व्यासपौर्णिमा असे देखील म्हंटल्या जाते. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस संपन्न होतो. भक्ताला परमेश्वराची ओळख गुरूमुळेचे होते त्यामुळे परमेश्वर आणि गुरू यांपैकी आधी नमस्कार कुणाला करावा हा प्रश्नं जर पडला तर आधी गुरूला नमस्कार करावा…भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार महर्षी व्यासांना समजले जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्यावेळी ’ज्ञानेश्वरी ’ लिहीण्यास सुरूवात केली त्यावेळी सुरूवातीलाच ’व्यासांचा मागोवा घेतु’ असा उल्लेख करून व्यासांच्या श्रेष्ठत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आपल्याला पहायला मिळते. भगवंत श्रीकृष्णांनी सांदिपनी ऋषींच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी आपले थोरले बंधु निवृत्तीनाथांनाच गुरू मानले, तर संत नामदेवांचे गुरू होते विसोबा खेचर… या गुरूपरंपेला पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की भारतीय परंपरेने गुरूला कायमच पुजनीय मानले आहे. पौर्णिमा म्हणजे प्रकाश ! गुरू नित्य शिष्याला ज्ञानाचे ज्ञानामृत पाजुन घडवत असतात अश्या गुरूची प्रार्थना करण्याचा हा दिवस….. आपली सर्वात पहिली गुरू म्हणजे आपली आई ! चांगले काय? वाईट काय याची जाणीव ती सर्वप्रथम आपल्याला करून देते आणि म्हणुन ती आपली गुरू ठरते.गुरू हा ज्ञानाचा सागर आहे. शिष्याने विनम्र भाव अंगी बाणवल्याशिवाय या गुरूरूपी सागरातील जल त्याला प्राप्त करता येणार नाही त्यामुळे शिष्याने नेहमी विनम्र असावे. 

गुरूब्रम्हा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।

गुरूसाक्षात् परंब्रम्ह तस्मै श्रीगुरूवे नमः।।