"Kojagiri Purnima"

हिंदू धर्मात सण-उत्सवांना आणि व्रतवैकल्यांना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमा आणि अमावस्येला आहे. काही अमावस्या आणि पौर्णिमा या विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात. अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही यापैकीच एक आहे. या पौर्णिमेला धर्मशास्त्रात खास स्थान आहे. अश्विन महिन्यात शरद पौर्णिमा साजरी केली जाते. ही पौर्णिमा देशातील विविध राज्यांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. तिला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असंही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृतवर्षाव होतो, असं मानलं जातं. त्यामुळं कोजागिरीच्या रात्री खीर चांदण्यात ठेवली जाते. त्यावर चंद्रकिरण पडल्यामुळं ती खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते. त्यामुळं लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवलं जातं. या रात्री लक्ष्मी येऊन आपलं घर ऐश्वर्यानं भरून टाकते, असं मानतात.