"Maker Sankrant"
मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते. मकर संक्रांतीचे महत्त्व या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते. ‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दान द्या ! मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते. दानात कोणत्या वस्तू द्याव्यात ? ‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात. सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात. ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते. सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते. मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्यास महापुण्य लाभते. तीळगुळाचे महत्त्व तीळ सत्त्व लहरी ग्रहण अन् प्रक्षेपण करतो. तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून रहाते. समाेरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते.