"Vat Purnima"

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतिला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायवयचे असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. तरी तीन दिवस व्रत- उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरुन तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत, मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी.